
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित जळगाव येथील विविध वैद्यकीय व शैक्षणिक महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन परिवारातील डॉक्टर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची जागतिक संकल्पना ‘उत्कृष्ट आरोग्यासह वृद्धत्व आणि योग’ अशी असून, वाढत्या वयात शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. नियमित योग साधनेमुळे शारीरिक क्षमता, मानसिक स्थैर्य आणि जीवनातील सकारात्मकता वाढते, हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
हा भव्य योग दिन कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ठीक ६ वाजता सारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज परिसर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामूहिक योग साधना कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.
या कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तसेच डॉ. केतकी पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थांमधील विद्यार्थी, डॉक्टर, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.
गोदावरी फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्राशी संबंधित संस्था म्हणून योग, व्यायाम आणि संतुलित जीवनशैलीचे महत्त्व समाजात रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गोदावरी फाउंडेशन परिवाराकडून आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात येणार आहे. गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आरोग्य, मानसिक शांतता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा ठरणार असून, मोठ्या सहभागामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.



