Home धर्म-समाज एकनाथ शिंदेंकडून संत मुक्ताई पालखीसाठी भव्य रथ समर्पित ; चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला...

एकनाथ शिंदेंकडून संत मुक्ताई पालखीसाठी भव्य रथ समर्पित ; चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला यश

0
22


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरच्या वारकरी आणि आध्यात्मिक परंपरेत ऐतिहासिक नोंद व्हावी अशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत मुक्ताई पालखी सोहळ्यासाठी भव्य रथ समर्पित केला आहे. संत मुक्ताई संस्थानच्या मागणीनुसार आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात आला असून परिसरात आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिर परिसरात हा नवीन रथ दाखल झाला असून वारकरी संप्रदायाकडून त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे. या रथाचे समर्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ केले असून, या भावनिक आणि आध्यात्मिक उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील वर्षी पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान संत मुक्ताई संस्थानने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विविध विकासात्मक मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र आणि भव्य रथ उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वाधिक महत्त्वाची होती. या मागणीचा सतत पाठपुरावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला असून, त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

नवीन रथ पूर्णतः तयार होऊन मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात दाखल झाला असून त्याची पाहणी आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे तसेच वारकरी, कीर्तनकार आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी सर्वांनी रथाच्या भव्यतेचे आणि कलात्मकतेचे कौतुक करत हा वारकरी परंपरेतील गौरवाचा क्षण असल्याचे मत व्यक्त केले. संत मुक्ताई पालखी सोहळा हा दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असतो. नव्या रथामुळे या सोहळ्याला अधिक दिमाख, आकर्षकता आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त होणार आहे. तसेच मुक्ताईनगरच्या धार्मिक पर्यटनालाही मोठा चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या रथाचा अधिकृत अनावरण सोहळा बुधवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे पार पडणार आहे. अनावरणानंतर संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार असून, या सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी उपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे, मागील काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः वारकरी वेश परिधान करून या सोहळ्यात सहभागी होत आहेत. डोक्यावर फेटा, खांद्यावर टॉवेल आणि वारकरी भावनेने ते पालखी प्रस्थान सोहळ्यात उपस्थित राहतात, ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.

या भव्य सोहळ्यास राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याने मुक्ताईनगर पुन्हा एकदा भक्तिभावाने उजळून निघणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे संत मुक्ताई संस्थानच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील आणि पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी राज्यभरातील वारकऱ्यांना या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound