Home Cities यावल गिरीषभाऊ महाजनांविरोधातील बदनामीकारक पोस्ट भोवली? भाजपकडून तातडीच्या कारवाईची मागणी

गिरीषभाऊ महाजनांविरोधातील बदनामीकारक पोस्ट भोवली? भाजपकडून तातडीच्या कारवाईची मागणी

0
27


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची सर्वसामान्य जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना कारवाईचे मागणी पत्र सादर केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या माध्यमांवर हेतूपुरस्सर ना. गिरीश महाजन यांचे चुकीचे फोटो आणि आक्षेपार्ह कमेंट्स करून त्यांची जनमानसातील प्रतिमा डागाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या विकृत कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असून, या प्रकाराविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.

यावल येथे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांना निवेदन देताना आमदार अमोल जावळे यांच्यासोबत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, भाजपचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, नगरसेवक उमेश फेगडे, हेमराज ऊर्फ बाळू फेगडे, भाजप तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर तायडे, भरत पाटील आणि डॉ. कुंदन फेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याचसोबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल नगरपालिकेच्या गटनेत्या नंदा महाजन, नगरसेवक योगेश चौधरी, नगरसेविका सविता नन्नवरे, डॉ. निलेश गडे, नगरसेविका कल्पना दिलीप वाणी, भूषण फेगडे, व्यंकटेश बारी, बबलू घारू, विलास चौधरी, संदीप सोनवणे, मुकेश कोळी, रितेश बारी, दिलीप वाणी, उज्ज्वल कानडे आणि कोमल इंगळे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून सायबर सेलच्या माध्यमातून दोषींवर कडक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली आहे.


Protected Content

Play sound