Home क्राईम गुजरातमधून चोरीस गेलेली ९ लाखांची कार जळगावात पकडली; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

गुजरातमधून चोरीस गेलेली ९ लाखांची कार जळगावात पकडली; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुजरातमधून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किमतीची किया कॅरेन्स कार जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिसांनी धाडसी कारवाई करत पकडली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करत चोरीचे वाहन ताब्यात घेतले असून, वाहन चालकासह कार गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबाद ग्रामीण येथील बोपल पोलीस ठाण्यात किया कंपनीची कॅरेन्स मोटार कार क्रमांक MP 04 ZS 5155 चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कार दिनांक १८ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश आहिरे आणि अफजल बागवान यांनी काशिनाथ चौक येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित किया कॅरेन्स कार येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने अजिंठा चौफुलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत वाहनाचा पाठलाग केला आणि अजिंठा चौफुली परिसरातील हिरो होंडा शोरूमसमोर कार अडवली. वाहन चालकाची चौकशी केली असता सदर कार गुजरातमधील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कार व चालकास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले.

याबाबत गुजरातमधील बोपल पोलीस ठाण्याला तातडीने माहिती देण्यात आली. त्यानुसार बोपल पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी जळगाव येथे दाखल झाले. त्यानंतर सुमारे ९ लाख रुपये किमतीची किया कॅरेन्स कार आणि संबंधित चालकास नियमानुसार गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत थिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार संदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश आहिरे आणि अफजल बागवान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound