
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी चांगलीच कानउघडणी केली. शनिवार (दि. २०) रोजी सकाळीच महापौरांनी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष जागेवर जाऊन नालेसफाईच्या कामांची पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कामातील निष्काळजीपणा पाहून त्यांनी टाऊन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना येत्या सोमवारी तातडीने अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या पाहणी दौऱ्याची सुरुवात संभाजीनगर चौक, विवेक कॉलनी आणि रविराज कॉलनी परिसरापासून केली. या भागात वायरिंगचे जाळे आणि नाल्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धक्कादायक बाब म्हणजे काही नाल्यांवर थेट घरे बांधून अतिक्रमणे करण्यात आल्याचे समोर आले. पावसाळ्यात पाणी वाढल्यास या भागात अत्यंत गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, अशी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांनी महापौरांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महापौरांनी स्वतः नाल्यांजवळ जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
त्यानंतर महापौरांनी रामानंदनगर परिसरातील विवेकानंद नगर आणि शिवनेरी सांस्कृतिक मंडळ परिसराला भेट दिली. यावेळी स्थानिक नागरिक प्रशांत पाटील यांच्यासह इतर रहिवाशांनी तक्रारींचा पाढा वाचला. पावसाचे पाणी नाल्यातून थेट घरांमध्ये, अंगणात आणि कंपाऊंडमध्ये शिरते, ज्यामुळे मोठी घाण पसरते आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, असे नागरिकांनी सांगितले. या समस्येवर तातडीने व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोमवारपर्यंत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश महापौरांनी नगररचना (टाऊन प्लॅनिंग) विभागाला दिले. महापौरांच्या या तत्परतेमुळे भारावून जाऊन रामानंदनगरमधील नागरिकांनी ‘केवळ आश्वासन देणारे नव्हे, तर प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करणारे पहिलेच महापौर पाहिले’ अशा शब्दांत त्यांचे आभार मानले. यानंतर रामानंदनगर घाटाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नाल्यात सुरू असलेले काम पाहून महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात प्रभाग क्रमांक ११ मधील खंडेराव नगर येथील रेल्वे पुलाजवळील नाल्याचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या समस्येचे निवारण करण्यासाठी सोमवारी अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. यासोबतच, प्रभाग क्रमांक १० मधील पिंप्राळा येथील वटुकेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्याची पाहणी महापौरांनी केली. या नाल्यात भूतकाळात काही नागरिक व गुरेढोरे वाहून गेल्याच्या दुर्दैवी दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील धोकादायक परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगररचना विभागाला विशेष निर्देश देण्यात आले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, सागर पाटील आणि महापालिका अधिकारी अतुल पाटील उपस्थित होते.



