Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील पेंशन व पीएफ कार्यशाळेत निवृत्तीवेतनधारकांना दिलासा 

जिल्हाधिकारी कार्यालयातील पेंशन व पीएफ कार्यशाळेत निवृत्तीवेतनधारकांना दिलासा 

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पेंशन व पीएफ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत निवृत्तीवेतनधारकांनी मांडलेल्या ११२ प्रश्नांपैकी सुमारे ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात आले असून, उर्वरित प्रश्नांवर संबंधित विभागांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृह येथे १९ जून रोजी जिल्हा पेंशन व पीएफ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, भविष्य निर्वाह निधी तसेच इतर आर्थिक बाबींशी संबंधित अडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेस जळगाव जिल्ह्यातील २४३ निवृत्तीवेतनधारक तसेच ७० आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांनी पेन्शन मंजुरी, पीएफ खात्याशी संबंधित अडचणी, प्रलंबित प्रकरणे आणि इतर आर्थिक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. कार्यशाळेदरम्यान सहभागींकडून एकूण ११२ तोंडी प्रश्न मांडण्यात आले. त्यापैकी जवळपास ८० टक्के प्रश्नांचे निराकरण जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव तसेच महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून तातडीने करण्यात आले. त्यामुळे अनेक निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला.

याशिवाय कार्यशाळेत एकूण ६५ लेखी अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांची तपासणी करून महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्याशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर पुढील स्तरावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ लेखाधिकारी श्रीमती जया गोमेझ यांनी दिली. ही कार्यशाळा जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), मुंबई येथील श्रीमती जया गोमेझ, महादेव एम. करांडे, श्रीमती सुप्रिया केळुस्कर आणि हिमांशू पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत अपर कोषागार अधिकारी खलील पटेल यांनी निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण केले. तसेच अपर कोषागार अधिकारी राजू पाटोळे, अपर कोषागार अधिकारी गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कोकरे यांनी केले, तर खलील पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी थेट ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.


Protected Content

Play sound