
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून अध्यक्षपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर उपाध्यक्षपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ही निवड केली असून शेतकी संघावर आमदार पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अमळनेर तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचे १०, काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनलचे ३, तर भाजप प्रणित किसान विकास पॅनलचे २ संचालक निवडून आले होते. बहुमताच्या जोरावर आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने शेतकी संघावर एकहाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया १९ रोजी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पार पडली. निर्धारित वेळेत सत्ताधारी गटाकडून अध्यक्षपदासाठी संभाजी पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी गणेश भामरे यांचेच अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी सहकार पॅनलचे संचालक संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, विक्रांत पाटील, नितीन पाटील, रणजीत पाटील, शंकर बैसाने, सुषमा देसले, मालुबाई पाटील, शेतकरी पॅनलचे सुरेश पाटील, प्रा. शाम पवार तसेच किसान विकास पॅनलचे जितेंद्र पाटील आणि प्रफुल पवार उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील तर सहाय्यक अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील आणि उपाध्यक्ष गणेश भामरे यांचा आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली संस्था जनतेने विश्वासाने आपल्याकडे सोपविली आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. येणाऱ्या काळात शेतकी संघाची आर्थिक स्थिती मजबूत करून उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर द्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील,” असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
संघाची बळकटी करण्यासाठी गरज पडल्यास कर्ज घेऊनही विकासकामे करण्याचा प्रयत्न केला जाईल. विरोधकांनी कितीही टीका केली तरी शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांनी पक्ष आणि पॅनलसाठी त्याग केला आहे, त्यांनाही भविष्यात संधी दिली जाईल, असे सूतोवाच त्यांनी केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पॅनल निवडून आणण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा विचार करून तज्ञ संचालक पदावर योग्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असेही आमदार पाटील यांनी संचालक मंडळाला सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले, तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश भामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील हे यापूर्वी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे.



