Home क्राईम  पोलिस दलातील ‘धुरंधर’ श्वान गुन्हे शोधक प्रशिक्षणासाठी हरियाणाला रवाना

 पोलिस दलातील ‘धुरंधर’ श्वान गुन्हे शोधक प्रशिक्षणासाठी हरियाणाला रवाना

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलिस दलातील अत्याधुनिक क्षमतेचा ‘धुरंधर’ नावाचा श्वान गुन्हे शोधक प्रशिक्षणासाठी रवाना होत आहे. बेल्जियन मालिनोज जातीचा हा श्वान हरियाणातील पंचकुला येथील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या विशेष श्वान प्रशिक्षण केंद्रात तब्बल ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणार आहे. गुन्हे तपासामध्ये पोलिसांना मदत करण्यासाठी धुरंधरला विशेष कौशल्यांनी प्रशिक्षित केले जाणार आहे.

धुरंधरचा जन्म १० नोव्हेंबर २०२५ रोजी झाला असून सध्या त्याचे वय ७ महिने ९ दिवस आहे. प्रशिक्षणासाठी तो हरियाणातील पंचकुला येथील ITBP प्रशिक्षण केंद्रात दाखल होणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान त्याला गुन्हे शोधक श्वान म्हणून विकसित करण्यात येणार असून, त्याची देखभाल आणि प्रशिक्षणाची जबाबदारी प्रथम हस्तक एचसी २९८८ भट्टू पाटील आणि द्वितीय हस्तक पीसी ११६७ हंसराज देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. धुरंधरच्या ९ महिन्यांच्या प्रशिक्षणामध्ये सुरुवातीचे तीन महिने शिस्त, आज्ञापालन आणि नियंत्रणासाठी ‘ओबिडियन्स’ प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांमध्ये वास ओळखण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये ओळख परेड, संशयित व्यक्तीचा माग काढणे, ट्रॅकिंग, ‘ड्रॉप अँड फाइंड’ तसेच विविध प्रकारचे वास ओळखण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

ITBP चे हरियाणातील पंचकुला येथील भानू केंद्र हे देशातील अग्रगण्य श्वान प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. या केंद्राला ‘नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज अँड ॲनिमल्स’ (NTCD&A) म्हणून ओळखले जाते. येथे केवळ ITBP साठीच नव्हे, तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) तसेच विविध राज्यांच्या पोलीस विभागांसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षित श्वान तयार केले जातात. या प्रशिक्षण केंद्रात श्वानांना गुन्हे तपास, सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादविरोधी कारवायांसाठी विविध प्रकारचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये ट्रॅकिंग, गस्त घालणे, लपवलेली स्फोटके शोधणे, अंमली पदार्थ शोधणे तसेच धोकादायक परिस्थितींमध्ये कारवाई करण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे.

याशिवाय अॅसॉल्ट ऑपरेशनमध्ये बंदुकधारी गुन्हेगार किंवा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी, ओलीस ठेवलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत पोलिसांना सहाय्य करण्यासाठी श्वानांना तयार केले जाते. वन्यजीव तस्करी रोखण्यासाठीही या केंद्रातून विशेष प्रशिक्षित ‘सुपर स्निफर्स’ तयार केले जातात. हे श्वान वाघ-बिबट्यांची कातडी, हत्तीचे सुळे, चंदनाची लाकडे यांसारख्या प्रतिबंधित वस्तू शोधण्यात सक्षम असतात. बेल्जियन मालिनोज ही जात वेग, चपळता, हुशारी आणि वास ओळखण्याच्या उत्कृष्ट क्षमतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे धुरंधरच्या प्रशिक्षणानंतर जळगाव जिल्हा पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाला मोठी मदत मिळणार आहे.


Protected Content

Play sound