रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) संघटनेच्या रावेर तालुकाध्यक्षपदी युवा पत्रकार, सहसंपादक आणि सामाजिक कार्यकर्ते मुबारक उर्फ राजू अलीखा तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे रावेर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्तीपत्रानुसार मुबारक तडवी यांची रावेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या समस्या, हक्क आणि कल्याणासाठी कार्य करणे तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांना प्रभावीपणे पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. संघटनेमध्ये सदस्य म्हणून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुबारक तडवी यांना अधिकृत सदस्यत्व प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो, नाव आणि तालुका अध्यक्षपदाचा उल्लेख करण्यात आला आहे.

न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे तसेच इतर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी मुबारक तडवी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकारिता क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संघटनेची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुबारक तडवी यांच्या नियुक्तीमुळे रावेर तालुक्यातील पत्रकारांना संघटनात्मक पातळीवर अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठविण्यासाठी आणि पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य सदस्य हेमकांत गायकवाड यांनी सांगितले की, संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आपण ऋणी असून पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करणार आहोत. मुबारक उर्फ राजू तडवी यांच्या नियुक्तीमुळे रावेर तालुक्यातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळाले असून, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटनात्मक प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.



