Home क्राईम ट्रान्सफॉर्मरच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक !

ट्रान्सफॉर्मरच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक !

0
15


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, भोकरी आणि कर्की परिसरातील शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याच्या नावाखाली माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराने प्रत्येकी सुमारे ५० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. पैसे भरूनही अनेक शेतकऱ्यांची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत पीडित शेतकऱ्यांनी महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या कामासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली, मात्र पैसे घेतल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाल्यास शेतीपंपांना नियमित वीज मिळण्यास मदत होणार होती. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून पैसे घेऊनही कामे प्रलंबित ठेवण्यात आली असून, वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांचे जबाब नोंदवावेत, आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराने यापूर्वी मुक्ताईनगर महावितरण विभागासह इतर विभागांमध्ये केलेल्या सर्व कामांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कामांमध्ये आर्थिक अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे किंवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधित ठेकेदाराला महावितरणच्या कामांमधून ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पीडित शेतकऱ्यांनी घेतलेली रक्कम परत मिळवून द्यावी, संबंधित ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन कामे देऊ नयेत तसेच या प्रकरणात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे संगनमत अथवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही विभागीय कारवाई करावी, अशा विविध मागण्या तक्रारीद्वारे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे अंतुर्ली, भोकरी, कर्की परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound