Home Cities जळगाव भुसावळ-चाळीसगाव वगळता सर्वच केंद्रांवर शंभर टक्के मतदान!

भुसावळ-चाळीसगाव वगळता सर्वच केंद्रांवर शंभर टक्के मतदान!

0
27


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी जळगाव जिल्ह्यात झालेल्या मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मतदानाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ९७.७८ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात अमळनेर, फैजपूर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पाचोरा आणि चाळीसगाव या सात ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली.

अमळनेर मतदान केंद्रावर ७६ पैकी ७६ मतदारांनी मतदान केले असून येथे १०० टक्के मतदान झाले. फैजपूर येथेही १०१ पैकी १०१ मतदारांनी मतदान करत शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. जळगाव, एरंडोल आणि पाचोरा या केंद्रांवरही अनुक्रमे १५५ पैकी १५५, ७९ पैकी ७९ आणि ६० पैकी ६० मतदारांनी मतदान केले.

भुसावळ मतदान केंद्रावर ११८ मतदारांपैकी ११६ मतदारांनी मतदान केले असून येथे ९८.३१ टक्के मतदान झाले. तर चाळीसगाव येथे मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी राहिली. चाळीसगाव केंद्रावर ४१ मतदारांपैकी २९ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ७०.७३ टक्के राहिली.

एकूण मतदानाच्या आकडेवारीत पुरुष मतदारांपैकी ३१५ पैकी ३०९ पुरुषांनी मतदान केले असून पुरुष मतदानाची टक्केवारी ९८.१० टक्के आहे. महिला मतदारांमध्ये ३१५ पैकी ३०७ महिलांनी मतदान केले असून महिला मतदानाची टक्केवारी ९७.४६ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. इतर प्रवर्गातील एकही मतदार नसल्याने त्यांची टक्केवारी शून्य आहे.

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील या निवडणुकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती.

जळगाव जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर झालेल्या मतदान प्रक्रियेत जवळपास शंभर टक्के मतदानाची नोंद झाली असून, आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound