
मुंबई- वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाने दिल्याची माहिती समोर आली आहे. १७ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या वायरलेस संदेशानुसार संबंधित खासदारांना तातडीने ‘Y+’ दर्जाची सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चर्चांना आणखी वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाने संसदीय पक्षाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र, सहा खासदारांनी या बैठकीला उपस्थित न राहता वेगळी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे खासदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
दरम्यान, खासदारांच्या संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी बंडखोरांवर कठोर शब्दांत टीका करत, पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना राजकीय पातळीवर उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी या घडामोडींवर भाष्य करताना शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही पक्षातील खासदार फोडण्याच्या राजकारणाला विरोध केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या वक्तव्यानंतर संभाव्य बंडखोर खासदारांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणांनी खबरदारी घेतल्याचे मानले जात आहे.
Y+ सुरक्षा व्यवस्थेमध्ये संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात. राजकीय परिस्थिती, संभाव्य धोका आणि गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात येतात. दरम्यान, सहा खासदारांच्या सुरक्षेत करण्यात आलेली वाढ ही केवळ सुरक्षेच्या कारणास्तव आहे की त्यामागे आगामी राजकीय घडामोडींचे संकेत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. शिवसेनेतील संभाव्य फूट आणि पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



