Home आरोग्य चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत कामात भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत कामात भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

0
23


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत जळगाव तालुका (ग्रामीण) काँग्रेस कमिटीने जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. रुग्णालयातील विद्युत व्यवस्था धोकादायक स्थितीत असून, शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

जळगाव तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम (उत्तर विभाग) आणि विद्युत विभाग जळगाव यांना दिलेल्या निवेदनात चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चोपडा उपजिल्हा रुग्णालयात विद्युत कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. रुग्णालयात वापरण्यात आलेली सुमारे ७० टक्के वायरिंग जुनी असून तीच पुन्हा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वापरण्यात आलेले ३३० एमएम फॅन निकृष्ट दर्जाचे असून काही फॅन बंद पडले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

रुग्णालयात लावण्यात आलेल्या ट्यूबलाईट फिटींगमध्येही त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लाईट व्यवस्था अपूर्ण असून काही लाईट सुरू नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

निवेदनात महिला वॉर्डमधील इन्व्हर्टरची वायरिंग खुली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच लहान मुलांच्या वॉर्डमध्येही वायरिंग सुरक्षित पद्धतीने करण्यात आलेली नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय अर्थिंगसाठी वापरण्यात आलेली जी.आय. वायरही योग्य पद्धतीने बसविण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काँग्रेस कमिटीने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारावर तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी जळगाव आणि संबंधित विभागीय कार्यालयांकडे पाठविण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. निवेदन देतांना मनोज चौधरी यांच्यासह जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष नीतीन चौधरी, बाळू पाटील, निलेश पाचपुळे, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा सोनवणे, राहूल पाथरवट, अरबाज शेख, चेतन पाथरवट, विशाल सपकाळे आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound