
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील शेतातील पिकाच्या नुकसानीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्यासह त्याच्या मुलाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा शिवारातील गट क्रमांक ३९४ व ३९५ मधील शेतात ही घटना घडली. १७ जून २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास पपई पिकाचे तसेच ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे नुकसान झाल्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला. या घटनेत जोगीलाल शंकर पारधी (वय ६०, रा. रामपुरा, चोपडा) आणि त्यांचा मुलगा दीपक पारधी यांना मारहाण करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार जोगीलाल पारधी हे चोपडा शिवारातील दिलीप विश्वम चव्हाण यांच्या शेतात निमबटाईने शेती करतात. त्यांनी या शेतात पपईचे पीक घेतले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी क्रमांक एक असलेल्या पवन सिताराम पारधी यांच्या आत्याच्या बकऱ्या शेतात शिरल्या. यामुळे पपई पिकाचे आणि ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शेतातील नुकसानीनंतर जोगीलाल पारधी यांनी संबंधित बकऱ्या पीक संरक्षण सोसायटीमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्याशी वाद घातल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पवन सिताराम पारधी, निलेश बापू भालेराव, विक्की अशोक पारधी आणि मयुर यादव सोनार (सर्व रा. चोपडा) यांनी जोगीलाल पारधी आणि त्यांचा मुलगा दीपक पारधी यांना गाठले.
या वादातून आरोपी पवन पारधी याने लाकडी शिंगाड्याने (दांडक्याने) जोगीलाल पारधी यांच्या डोक्यावर आणि छातीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या दीपक जोगीलाल पारधी यांच्यावर सध्या चोपडा येथील हरताळकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जोगीलाल पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम १०९, २९६, ११५ (२), ३५१ (३), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी करत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेतील संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे.
चोपडा शिवारात पिकाच्या नुकसानीवरून झालेल्या वादाने गंभीर स्वरूप घेत शेतकरी आणि त्याच्या मुलाला मारहाण झाल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.



