पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी दीपक पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. धुळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दीपक पाटील यांची खात्यांतर्गत झालेल्या बदल्यांनुसार पारोळा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध धंद्यांवर कारवाईबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
पारोळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रभारी अधिकारी योगेश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता दीपक पाटील यांनी त्यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. याचवेळी नवीन बदलून आलेले सहायक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे यांनीदेखील पारोळा पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारला आहे.

नवीन पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर दीपक पाटील यांच्यासमोर पारोळा शहर आणि तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे महत्त्वाचे आव्हान असणार आहे. विशेषतः अवैध व्यवसाय, जुगार, मटका, अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर वाहतूक तसेच इतर गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही नागरिकांची प्रमुख अपेक्षा आहे.
पारोळा शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय व्हावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नवीन नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक गतिमान होऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण, नागरिकांशी समन्वय आणि पारदर्शक पोलीस प्रशासन यावर भर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवून पारोळा तालुक्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.



