Home प्रशासन दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पबाधितांचा रोजगारासाठी एल्गार 

दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पबाधितांचा रोजगारासाठी एल्गार 

0
53


दीपनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या रोजगार, पुनर्वसन आणि सीएसआर निधीच्या प्रश्नांवर आता आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प रोजगार मोर्चा” अंतर्गत फेकरी येथे प्रकल्पबाधित गावांतील तरुण, शेतकरी, कामगार आणि नागरिकांची भव्य महाबैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत प्रकल्पबाधितांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाकडे ठोस मागण्या करण्यात आल्या.

ही बैठक वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थित नागरिकांनी दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी परिसरातील गावांनी जमीन, पाणी आणि पर्यावरणाचा त्याग केला असल्याचे सांगत, त्याच्या मोबदल्यात स्थानिकांना अपेक्षित रोजगार, सुविधा आणि विकास मिळालेला नसल्याची भावना व्यक्त केली.

बैठकीत प्रकल्पातील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी भरतीमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. प्रकल्प उभारणीसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आणि ज्यांच्या जीवनावर परिणाम झाला, त्या प्रकल्पबाधित कुटुंबांना रोजगाराच्या संधी मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या वापराबाबतही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. मोठ्या उद्योगांकडून सामाजिक बांधिलकी म्हणून मोठ्या प्रमाणात निधी खर्च अपेक्षित असताना, प्रकल्पबाधित गावांमध्ये त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अनेक विकासकामे केवळ कागदोपत्री दाखवली जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने महाजनकोला दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला. प्रकल्पबाधित गावांमध्ये आरोग्य सुविधा, शिक्षण, पिण्याचे पाणी, पर्यावरण संरक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. बैठकीत प्रकल्पबाधित युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे, सर्व कंत्राटी व कायमस्वरूपी भरती प्रक्रियेत स्थानिकांना संधी देणे, सीएसआर निधीचा मागील दहा वर्षांचा सार्वजनिक लेखाजोखा जाहीर करणे, प्रकल्पबाधित गावांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणे तसेच पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करणे, असे विविध ठराव मंजूर करण्यात आले.

मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात मोठ्या प्रमाणावर लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. बैठकीला भुसावळ आणि रावेर तालुक्यातील प्रकल्पबाधित गावांमधील युवक, शेतकरी, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप “जमीन आमची – हक्क आमचा, रोजगार आमचा”, “प्रकल्पबाधितांना न्याय मिळालाच पाहिजे” आणि “संघर्ष हक्कासाठी – लढा रोजगारासाठी” अशा घोषणांनी करण्यात आला. दीपनगर प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांवर आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound