


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी फसवी कर्जमाफी आणि पीक विम्याच्या प्रश्नावर सुरू केलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनीही मैदानात उतरून शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘भीक मागो’ आंदोलन करत सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे कालपासून आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. फसवी कर्जमाफी आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या वतीने डॉक्टरांची टीम आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने तुपकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. आंदोलन दडपण्याचा सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला होता. त्यानंतर आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी आज शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जात ‘भीक मागो’ आंदोलन केले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शर्वरी तुपकर यांच्या सहभागामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, शेतकरी वर्गातूनही या आंदोलनाला समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आता सरकार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार, तसेच चर्चेतून तोडगा काढला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



