


शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर विभागाकडून सुरू झालेल्या धडक कारवायांचा परिणाम आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला तसेच इतर अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या कारवाईची धास्ती शेंदुर्णी शहरातही जाणवली असून मंगळवारी अनेक पान टपऱ्या आणि काही दुकाने बंद अवस्थेत दिसून आली.
अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरात भेसळयुक्त दूध, औषधे, मिठाई, किराणा माल तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर कारवाईचा वेग वाढवला आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या धाडसत्रामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याच्या विक्रीविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली असून, सक्रिय विक्रेत्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची तयारी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईची झळ शेंदुर्णी शहरातही जाणवली. आज दि. १६ जून २०२६ रोजी चौका-चौकात असलेल्या अनेक पान टपऱ्यांना कुलूप लागलेले दिसून आले. तसेच काही दुकानांवरही टाळे लावण्यात आले होते. अचानक मोठ्या प्रमाणावर दुकाने बंद असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले.
याबाबत माहिती घेतली असता, जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शेंदुर्णी परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विक्रेत्यांना आधीच मिळाल्याची चर्चा गावात सुरू होती. तपासणीदरम्यान कारवाई होण्यापेक्षा खबरदारी म्हणून काही विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली असल्याचे बोलले जात होते. अन्न व औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांमुळे नियमबाह्य विक्री करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये प्रशासन अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. मात्र शेंदुर्णी परिसरातील बंद दुकानांबाबत अधिकृत कारवाई किंवा तपशील प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही.



