Home Cities जळगाव शेठ ला. ना. सा. विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात

शेठ ला. ना. सा. विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात

0
40


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात करण्यात आला. सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ७ वाजता आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची आराध्य देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे तसेच ग्रंथ पालखीचे पूजन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, सहसचिवा मीरा गाडगीळ, ज्येष्ठ संचालक प्रा. शरदचंद्र छापेकर, पारसमल कांकरिया, समन्वयिका लता छापेकर, विजयालक्ष्मी परांजपे, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी इयत्ता पाचवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे टिळा लावून औक्षण करण्यात आले. गुलाबपुष्प देऊन आणि पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रंथ पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमात शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनंतर उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले. संगीत शिक्षिका संपदा छापेकर यांनी स्वरचित शालेय गीत सादर केले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार, स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व समजावे यासाठी “फुग्यावरील संदेश वाचन” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी प्राजक्ता गोहिल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मीरा गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचा परिसर आकर्षक रांगोळ्या, सुंदर फलक लेखन, स्वच्छता आणि सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता गोहिल यांनी केले तर आभार वृषाली पाटील यांनीमानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

 


Protected Content

Play sound