जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यात्री सुविधा दिवसाच्या निमित्ताने जळगाव विमानतळाच्या विकासाचा आढावा घेत विमानतळ प्रशासनाने प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा विस्तार, सुरक्षा व्यवस्था आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या (AAI) माध्यमातून जळगाव विमानतळावर प्रवाशांना सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे विमानतळ संचालक हर्ष कुमार त्रिपाठी यांनी सांगितले.
जळगाव विमानतळ मार्च २०२४ पासून कार्यान्वित झाले असून आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विमानतळावरून ७२ हजार ६ प्रवाशांनी आगमन सेवा तर ७१ हजार ९८६ प्रवाशांनी प्रस्थान सेवेचा लाभ घेतला आहे. सध्या विमानतळावर सुमारे २९ कायमस्वरूपी कर्मचारी आणि ३५ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. जळगाव विमानतळावर सध्या Fly91 आणि Alliance Air यांच्या माध्यमातून नियमित विमानसेवा सुरू आहे. याशिवाय Skynex Aviation आणि FlyOla Aviation Academy यांच्या माध्यमातून उड्डाण प्रशिक्षण उपक्रमही राबविले जात आहेत. सध्या सुमारे १०० प्रशिक्षणार्थी पायलट विमान संचालनाचे प्रशिक्षण घेत आहेत.

नियमित विमानसेवेमुळे जळगावची हवाई जोडणी पुणे, मुंबई, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांशी झाली आहे. या हवाई संपर्कामुळे जळगाव परिसरातील उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. विशेषतः केळी उत्पादन आणि सुवर्ण व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सध्या विमानतळावरील टर्मिनल इमारतीची क्षमता सुमारे १२० प्रवाशांची असून ती वाढवून ३०० प्रवाशांची करण्याचे नियोजन आहे. यासाठी जवळपास २५ कोटी रुपयांच्या टर्मिनल आणि एप्रन विस्तार प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
सध्या जळगाव विमानतळावरील धावपट्टीची लांबी सुमारे १.७ किलोमीटर आहे. भविष्यात विमानतळाच्या मास्टर प्लॅननुसार ही धावपट्टी ३ किलोमीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. या विस्तारामुळे मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या सेवेसाठी मार्ग मोकळा होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावर स्नॅक बार, वैद्यकीय मदत केंद्र, मोफत वाय-फाय सुविधा आणि स्वच्छ व सुविधायुक्त प्रवासी टर्मिनल उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत.
जळगाव विमानतळाचे महत्त्व केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नसून पर्यटन आणि धार्मिक क्षेत्रासाठीही मोठे आहे. अजंता लेणी, अमळनेर आणि शेगाव यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटन व धार्मिक स्थळांच्या जवळ हे विमानतळ असल्याने भविष्यात पर्यटन विकासासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही जळगाव विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विमानतळ प्रशासन सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रातही सक्रिय आहे. ‘प्रदीप्ती’ कार्यक्रमांतर्गत २०२४ आणि २०२५ या वर्षांत सुमारे १०० विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि औद्योगिक जागरूकता देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या अप्रेंटिसशिप आणि कौशल्य विकास योजनांद्वारे विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळाची नियमित तपासणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) यांच्याकडून केली जाते. जळगाव विमानतळाला वर्ष २०२८ पर्यंत परवानाधारक विमानतळ (Licensed Aerodrome) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित अग्निशमन व बचाव पथक, दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध आहेत. तांत्रिक सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली असून विमान वाहतूक नियंत्रण (ATC) आणि पायलट यांच्यातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्चून नवीन VHF संचार उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणांचे यशस्वीपणे कार्यान्वयन पूर्ण झाले आहे.
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जळगाव विमानतळाने हरित ऊर्जेच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विमानतळ परिसरात २२८ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून या माध्यमातून विमानतळाची संपूर्ण विद्युत गरज भागविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. जळगाव विमानतळाच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प कायम असून सुरक्षित, सोयीस्कर आणि गुणवत्तापूर्ण हवाई सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे विमानतळ संचालक हर्ष कुमार त्रिपाठी यांनी सांगितले.



