Home आरोग्य चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यावर यशस्वी उपचार; महादेव हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यावर यशस्वी उपचार; महादेव हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी

0
47


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मूत्रपिंडातील खड्यांवरील उपचार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महादेव हॉस्पिटल, जळगाव यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. चीर न देता आणि कमी त्रासदायक पद्धतीने मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी अत्याधुनिक फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी विथ लेझर पल्व्हरायझेशन ही शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीरित्या पार पडली असून, यामुळे रुग्णांना सुरक्षित, वेदनारहित आणि जलद उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

चोपडा येथील ५० वर्षीय महिलेच्या उजव्या मूत्रपिंडामध्ये खडा असल्याचे निदान झाले होते. या रुग्णावर महादेव हॉस्पिटलमध्ये राईट आरआयआरएस (रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी) विथ लेझर पल्व्हरायझेशन ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या उपचारामुळे रुग्णाला कोणतीही मोठी चीर न देता मूत्रपिंडातील खडा काढण्यात आला असून, सध्या त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी (RIRS) ही मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक आणि कमी त्रासदायक उपचारपद्धती आहे. या पद्धतीमध्ये शरीरावर कोणतीही चीर न देता लवचिक युरेटेरोस्कोपच्या साहाय्याने मूत्रमार्गातून मूत्रपिंडापर्यंत पोहोचले जाते. त्यानंतर लेझर तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्यांचे बारीक कणांमध्ये रूपांतर करून ते प्रभावीपणे काढले जातात.

या अत्याधुनिक पद्धतीमुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्रावाचा धोका कमी होतो तसेच रुग्ण लवकर सामान्य जीवनाकडे परतू शकतो. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही पद्धत अधिक सुरक्षित आणि परिणामकारक मानली जाते.

महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करत वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशस्वी उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूमध्ये प्रा. व विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांचा समावेश होता. तसेच भूलतज्ज्ञांच्या चमूमध्ये प्रा. डॉ. रघुनाथ बराटे आणि डॉ. ननिता चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अत्याधुनिक फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी आणि लेझर तंत्रज्ञानामुळे आता मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खड्यांवर अधिक सुरक्षित, प्रभावी आणि जलद उपचार उपलब्ध झाले आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्यांचे सूक्ष्म कण करून त्यांचे निर्मूलन केले जाते, त्यामुळे रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेचा त्रास सहन करावा लागत नाही.

महादेव हॉस्पिटलने कमी चिरफाडीतून होणाऱ्या अत्याधुनिक उपचारांच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. जळगाव आणि परिसरातील रुग्णांसाठी आधुनिक युरोलॉजी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगिरी विशेष महत्त्वाची ठरत आहे.


Protected Content

Play sound