Home Cities यावल यावल खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी नारायण चौधरी ; व्हाईस चेअरमनपदी प्रवीण वारके यांची...

यावल खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी नारायण चौधरी ; व्हाईस चेअरमनपदी प्रवीण वारके यांची बिनविरोध निवड

0
9

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादितच्या चेअरमनपदी भालोद येथील नारायण शशिकांत चौधरी यांची, तर व्हाईस चेअरमनपदी न्हावी येथील प्रवीण भास्कर वारके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावल येथील संघाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहनिबंधक अच्युत भागानगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या खरेदी-विक्री संघाच्या नेतृत्व निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चेअरमनपदासाठी नारायण चौधरी आणि व्हाईस चेअरमनपदासाठी प्रवीण वारके यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

नारायण शशिकांत चौधरी हे आमदार अमोलभाऊ जावळे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे संघाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर प्रवीण वारके यांच्या निवडीमुळे संघाच्या प्रशासनात अनुभवी नेतृत्वाची भर पडल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

निवडीनंतर आयोजित बैठकीत नूतन चेअरमन नारायणबापू चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत संघाच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेतकरी हिताच्या योजना प्रभावीपणे राबवून संघ अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संचालकांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिरालाल चौधरी यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. सहकार क्षेत्रातील संस्थांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अधिक प्रभावी भूमिका बजावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नव्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस मावळते व्हाईस चेअरमन अतुल भागवत भालेराव, संचालक नरेंद्र विष्णू भंगाळे, उमेश फेगडे, हेमराज उर्फ बाळासाहेब फेगडे, धनंजय यशवंत फिरके, शिवसेनेचे तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील, तेजस धनंजय पाटील, आरती शरद महाजन, नयना चंद्रशेखर चौधरी, नरेंद्र वामन कोल्हे, अतुल वसंतराव पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, कृउबा समितीचे माजी सभापती तथा भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश वसंत फेगडे, जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक गणेश नेहते, सुनील फिरके, विलास चौधरी, नितीन महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound