जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे मोतीबिंदू निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या अभियानाअंतर्गत यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून गरजू व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तसेच ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ व वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. १० जून रोजी अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत तसेच मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाचे समन्वयक डॉ. नि. तु. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियानाच्या प्रारंभी यावल तालुक्यातील गाडऱ्या, जामन्या आणि उसमली या गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांसोबतच कान-नाक-घसा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही उपस्थित होती. नागरिकांच्या डोळ्यांसह इतर आरोग्यविषयक समस्यांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. यावल तालुक्यात एकूण २४ टप्प्यांमध्ये विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये केवळ मोतीबिंदूच नव्हे तर इतर नेत्रविकार, कान-नाक-घसा विकार तसेच विविध आरोग्य समस्यांची तपासणी केली जाणार आहे. गरजेनुसार रुग्णांना उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६ रुग्णांमध्ये मोतीबिंदू अथवा इतर गंभीर नेत्रविकार आढळून आल्याने त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या रुग्णांना आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचे वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

तपासणीदरम्यान नागरिकांना डोळ्यांचे आरोग्य जपण्याबाबत, मोतीबिंदूची सुरुवातीची लक्षणे ओळखण्याबाबत, वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व तसेच कान-नाक-घसा विकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अभियानांतर्गत १२ जून रोजी मानपूर, मालोद, वाघझिरा आणि नायगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम भेट देणार आहे. त्यानंतर १५ जून रोजी मोहराळे, हरिपुरा आणि वद्री, १७ जून रोजी धुलेपाडा, कालाडोह आणि हिंगोणा तसेच १९ जून रोजी डांभुर्णी, कोळन्हावी आणि डोणगाव येथे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या मोहिमेचा समारोप ५ ऑगस्ट रोजी अकलूद, भालोद आणि अट्रावल येथे होणार आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. वैष्णव, डॉ. गौरव, डॉ. दर्शनी आणि डॉ. मुग्धा यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक ग्रामस्थांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानत भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



