Home आरोग्य महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावरील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान उपचार सेवा सुरू

महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावरील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान उपचार सेवा सुरू

0
11

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आरोग्यसेवा क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरत महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावरील उपचारांसाठी अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी (RIRS) आणि फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खड्यांवर अत्याधुनिक आणि कमी वेदनादायी उपचार उपलब्ध करून देणाऱ्या या यंत्रणेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महादेव हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रा. डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी, डॉ. श्रीकांत रेड्डी, प्रा. डॉ. रघुनाथ बराटे आणि डॉ. ननिता चौधरी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवीन लेझर प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांना अधिक सुरक्षित, जलद आणि प्रभावी उपचार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. हेमंत केळकर यांनी या तंत्रज्ञानाची माहिती देताना सांगितले की, मूत्रपिंड आणि मूत्रमार्गातील खड्यांवर मोठी शस्त्रक्रिया न करता किंवा अत्यल्प चिरफाड करून उपचार करण्यासाठी रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी आणि फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी ही पद्धत अत्यंत प्रभावी मानली जाते. अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खड्यांचे सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करून ते सुरक्षितपणे बाहेर काढले जातात. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, अल्प कालावधीचा रुग्णालयातील मुक्काम आणि जलद पुनर्वसनाचा लाभ मिळतो. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. उल्हास पाटील यांनी या उपचार पद्धतीचा लाभ सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका स्पष्ट केली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना हे अत्याधुनिक उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांनाही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महादेव हॉस्पिटलच्या आधुनिक आरोग्यसेवा उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांसाठी अशा प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सुविधा मोठा दिलासा ठरणार असून, जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होईल, असे मत व्यक्त करण्यात आले. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णकेंद्री सेवा यामुळे महादेव हॉस्पिटल जळगावच्या आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण करीत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नवीन लेझर प्रणालीच्या माध्यमातून मुतखड्यावरील उपचार अधिक प्रभावी, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याने जिल्ह्यातील हजारो रुग्णांना याचा थेट लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound