जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून पुढील आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यासाठी कोळी महासंघ, जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी संपन्न झाली. या बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात येत्या १६ जून २०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील तसेच युवा प्रदेश अध्यक्ष ॲड. चेतन पाटील (मुंबई) यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत कोळी समाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या समस्या, शासनस्तरावरील प्रलंबित मागण्या आणि त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पुढील कृती आराखड्यावर पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने १५ जून रोजी जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील ठराव सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजूर केला. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. ठरावावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये रामचंद्र काशिनाथ सपकाळे, वासुदेव पुंडलिक सोनवणे, जितेंद्र शांताराम सपकाळे, संदीप दत्ताराम कोळी, नारायण झगु कोळी, संतोष आत्माराम कोळी, हरीलाल रमेश कोळी, प्रल्हाद भगवान सोनवणे, दीपक सोमा तायडे, बाळासाहेब शेंदाणे, गजानन सोनवणे, सुभाष सोनवणे, विशाल सपकाळे, देविदास कोळी, भगवान जैतकर, खेमचंद कोळी आणि विजय कोळी यांचा समावेश होता. पदाधिकाऱ्यांनी कोळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच निवेदनाद्वारे समाजाच्या मागण्या शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क आणि संघटनात्मक प्रयत्न करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.



