
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार साहेब) पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्हा कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पक्षध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीतील नेत्रदीपक यशानंतर आलेल्या या वर्धापन दिनामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या आजवरच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेण्यात आला. तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी पक्षाने केलेल्या संघर्षाची आठवण यावेळी जागविण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित सर्वांनी केला.

या विशेष प्रसंगी जळगाव शहर महानगर अध्यक्ष ईजाजभाई मलिक यांच्या हस्ते मुख्य पक्ष ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी, पक्ष ध्वजस्तंभाचे विधीवत पूजन माजी महानगर अध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आले, तर जिल्हा समन्वयक विकासदादा पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्याचे नेटके आयोजन व नियोजन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. वाय. एस. महाजन सर यांनी केले होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केक कापून पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पदाधिकाऱ्यांनी शरद पवार साहेबांच्या ५ दशकांहून अधिक काळ चाललेल्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. पवार साहेबांनी नेहमीच ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या सूत्राचा अवलंब करत देशात व राज्यात आदर्श निर्माण केल्याचे वक्त्यांनी सांगितले. साहेबांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले ऐतिहासिक आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे केलेले नामविस्तार, शेतकरी बांधवांना दिलेली ऐतिहासिक एकरकमी कर्जमाफी आणि देश विदेशातील युवकांसाठी आयटी क्षेत्राची दारे खुली करत रोजगार निर्मितीसाठी उचललेली पावले, अशा अनेक लोककल्याणकारी कामांची माहिती यावेळी देण्यात आली. साहेबांचे हे सर्व निर्णय आणि पक्षाचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याची शपथ यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतली.
या वर्धापन दिन सोहळ्याला मंगला पाटील, एस. डी. पाटील, महाडिक, विलास भाऊसाहेब पाटील, ॲड. राजेश गोयल, जयप्रकाश चांगरे, डी. एम. पाटील, रिंकू चौधरी, विनायक पाटील, सुनील भैय्या माळी, गौरव पाटील, रमेश पाटील, गिरीश सांगळे, अकील पटेल यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक बळकट करून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार वाय. एस. महाजन सर यांनी मानले.



