
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपरखेड येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात अज्ञात चोऱ्यांनी डल्ला मारत मूर्तीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोऱ्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसाराम त्र्यंबक पाटील (वय ६९ वर्षे, रा. बहादरपूर, ता. पारोळा) हे पिंपरखेड येथील मारुती मंदिरात पूजारी म्हणून काम पाहतात. नेहमीप्रमाणे दिनांक ८ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता ते मंदिरात पूजेसाठी आले होते. रात्रीच्या वेळी मंदिराची साफसफाई करून आणि दरवाजे कुलूप लावून बंद केल्यानंतर ते जवळच असलेल्या राम मंदिराच्या बाजूला झोपण्यासाठी गेले होते.
सकाळी उघडकीस आला प्रकार
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ९ जून २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पूजारी आसाराम पाटील हे नेहमीप्रमाणे राम मंदिराचा दरवाजा उघडून मारुती मंदिराजवळ आले. मंदिरात झाडू मारत असताना, त्यांना मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि कानावरील चांदीची मासळी गायब असल्याचे दिसून आले. चोरांनी गाभाऱ्यात प्रवेश करून मूर्तीचे दागिने चोरून नेले होते, तर गळ्यातील चांदीचा हार मात्र तिथेच मिळून आला.
पूजाऱ्यांनी तातडीने मंदिराचे विश्वस्त वासुदेव सोनार व इतर ग्रामस्थांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. सर्वांनी मिळून मंदिर परिसर व आजूबाजूला शोध घेतला, मात्र चोरलेले दागिने मिळून आले नाहीत.
६५ हजारांचा मुद्देमाल लंपास
या चोरीच्या घटनेत चोरांनी मंदिरातील खालील मुद्देमाल चोरून नेला आहे:
१) सुमारे ५०० ग्रॅम वजनाचा मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट (किंमत अंदाजे रु. ५०,०००/-)
२) सुमारे १५० ग्रॅम वजनाची मूर्तीच्या कानातील चांदीची मासळी (किंमत अंदाजे रु. १५,०००/-)
असा एकूण ६५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला आहे.
पोलीसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी पूजारी आसाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ प्रमाणे अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा रजि. नंबर २१०/२०२५ अन्वये दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कैलास सुरेश साळुंके (PCMH93288) व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण पाटील करत आहेत. ग्रामीण भागातील मंदिरात झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



