
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित २०२५-२६ च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाल संस्कार विद्या मंदिर, यावल येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. सानवी पंकज गडे हिने तृतीय क्रमांक पटकावत शाळा, यावल शहर आणि जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.

कु. सानवी हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वशैली, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर राज्यस्तरावर हे यश संपादन केले. ती प्रा. पंकज गडे यांची कन्या असून तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालय, शिक्षकवृंद, पालक तसेच यावलकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कु. सानवीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक सुनील माळी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक तसेच शहरातील विविध स्तरांतील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील या यशामुळे बाल संस्कार विद्या मंदिरच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. कु. सानवीच्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.



