
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील मानमोडीकर यांनी केली आहे.

शासकीय हवामान अंदाजानुसार यंदाच्या खरीप हंगामात हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टीची शक्यता आणि विविध नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे आबा पाटील यांनी म्हटले आहे.
देशासह महाराष्ट्रातील लहान-मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांवर विविध संकटांचे सावट असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच खते, बियाणे, डिझेल, पेट्रोल यांचे वाढते दर, खतांचा तुटवडा आणि खतांवरील जीएसटीमुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील काळातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही पूर्णपणे मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरपाई आणि ‘सातबारा कोरा’ करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी याला राज्यातील सर्वात मोठे मदत पॅकेज म्हणून प्रसिद्धी देण्यात आली. मात्र जून महिना सुरू होऊनही अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप आबा पाटील यांनी केला आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच घेतलेल्या कापूस आयात शुल्क माफीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. हा निर्णय महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राज्यभर आंदोलने आणि निदर्शने करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घेऊन तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात बोलताना आबा पाटील यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरात भूकंपाच्या काळात शरद पवार यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीचा उल्लेख केला. त्याच धर्तीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि खासदार यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये सक्रियपणे लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील धोरणाप्रमाणे विना अट आणि सरसकट मदत देण्यात यावी, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



