Home प्रशासन जिल्हा परिषद आईच्या स्मृतीप्रित्यर्थ नायगाव ग्रामपंचायतीला शवपेटी भेट 

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ नायगाव ग्रामपंचायतीला शवपेटी भेट 

0
19


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि गावाच्या गरजा ओळखून केलेले कार्य हेच खऱ्या अर्थाने लोकसेवेचे उदाहरण ठरते. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे अशाच एका स्तुत्य उपक्रमाची नोंद झाली आहे. स्वर्गीय सुलोचना रामू महाजन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी सरपंच किशोरभाऊ रामू महाजन आणि अशोकभाऊ रामू महाजन यांनी नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीला शवपेटी सप्रेम भेट देत सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण केला आहे.

ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी वेळ लागल्यास मृतदेह सुरक्षित ठेवण्याची मोठी अडचण निर्माण होते. अशा वेळी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन महाजन बंधूंनी गावासाठी उपयुक्त ठरणारी शवपेटी ग्रामपंचायतीला भेट देण्याचा निर्णय घेतला.

नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरभाऊ महाजन यांनी पदावर नसतानाही गावाच्या गरजांची जाणीव ठेवत हा उपक्रम राबविला. आपल्या मातोश्रींच्या स्मृती जपताना संपूर्ण गावासाठी कायमस्वरूपी उपयोगी पडणारी सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक कार्याची नवी दिशा दाखवून दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नायगावसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाजन बंधूंनी दिलेली शवपेटी ग्रामपंचायतीच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली असून भविष्यात गावातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तिचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी नागरिकांची होणारी धावपळ कमी होणार असून ही सुविधा गावासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून स्वागत करण्यात येत आहे. आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ गावासाठी लोकहिताचा उपक्रम राबविल्याबद्दल महाजन बंधूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेचे अभिनंदन करत हा आदर्श इतरांनीही घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान पदाधिकारी, ग्रामस्थ, महाजन परिवारातील सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महाजन बंधूंच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound