Home पर्यावरण रावेर-यावलमधील वादळग्रस्त भागांची आ.अमोल जावळे उद्या करणार पाहणी

रावेर-यावलमधील वादळग्रस्त भागांची आ.अमोल जावळे उद्या करणार पाहणी

0
17


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर आणि यावल तालुक्यात ४ जून रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विशेषतः केळी उत्पादक पट्ट्यात वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी गारपिटीमुळे इतर पिकांचेही नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी महसूल विभाग, कृषी विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त भागांमध्ये उद्या सकाळपासून पंचनामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण आणि पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आणि शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, आमदार अमोल जावळे हे उद्या सकाळी स्वतः नुकसानग्रस्त गावांना भेट देणार असून प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील तसेच झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत आणि योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या पंचनाम्यांनंतर प्रत्यक्ष नुकसानाचा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आमदार अमोल जावळे यांनी घेतलेल्या तातडीच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound