Home पर्यावरण वन्यजीवांच्या पाण्यावर डल्ला? चांगदेव-मानेगाव पाझर तलावातील अवैध पाणी विक्रीचा आरोप; आंदोलनाचा इशारा

वन्यजीवांच्या पाण्यावर डल्ला? चांगदेव-मानेगाव पाझर तलावातील अवैध पाणी विक्रीचा आरोप; आंदोलनाचा इशारा

0
19


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव-मानेगाव शिवारातील पाझर तलाव क्रमांक १९१ मधून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या पाणी उपसा करून त्याची विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी केला आहे. या प्रकारामुळे वन्यजीव, गुरेढोरे आणि ग्रामस्थांच्या पाण्याच्या हक्कांवर गदा येत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

चांगदेव-मानेगाव परिसरातील हा पाझर तलाव जिल्हा परिषद जलसिंचन विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. परिसरातील वन्य प्राणी, गुरेढोरे तसेच पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवण्यासाठी या तलावाचे मोठे महत्त्व आहे. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही व्यक्ती मोटारी आणि पाईपलाईनच्या माध्यमातून तलावातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा करत असून ते पाणी इतर शेतकऱ्यांना विक्रीसाठी पुरविले जात आहे.

या अवैध पाणी उपशामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. आगामी काळात पावसाळा उशिरा झाल्यास किंवा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास वन्यजीव, जनावरे आणि ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या प्रकाराबाबत संबंधित विभागांकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी किंवा ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याशिवाय तलावातील पाण्याची सर्रास विक्री होत असल्याच्या चर्चांमुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासन, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांकडे अवैध पाणी उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी व पाईपलाईन जप्त करून दोषींवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग अथवा दुर्लक्ष आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका वन्यजीव प्रेमींनी मांडली आहे.

पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जनहित याचिका दाखल करण्यासह व्यापक लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


Protected Content

Play sound