Home Cities जळगाव गाळे भाडेकरू प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करा; सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील

गाळे भाडेकरू प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करा; सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळेभाडेकरूंसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. शासन स्तरावर या विषयाचा पाठपुरावा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

डॉ. पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका अधिनस्त गाळेभाडेकरूंशी संबंधित प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा तसेच संबंधित विषय शासन स्तरावर निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, गाळेभाडेकरू प्रकरण रखडल्यामुळे महानगरपालिकेला मिळणाऱ्या महसुलावर प्रतिकूल परिणाम होत आहे. परिणामी महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर ताण निर्माण होत असून विविध विकासकामे आणि नागरी सुविधांच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या उत्पन्न स्रोताकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेमार्फत नागरिकांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत गाळेभाडेकरूंकडून मिळणारा महसूल हा मनपासाठी महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे. या उत्पन्न स्रोताकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मनपाच्या महसुलात घट होत असून त्याचा परिणाम शहराच्या विकासकामांवर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

गंभीर स्वरूपाच्या या विषयाची दखल घेऊन कोणतीही दिरंगाई न करता शासनाशी समन्वय साधावा, प्रलंबित प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा आणि महानगरपालिकेचा महसूल वाढीस लागेल अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound