Home प्रशासन भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांविरोधात विशेष मोहीम सुरू 

भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांविरोधात विशेष मोहीम सुरू 

0
15


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन नगरपालिकेने विशेष कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने आजपासून शहरभर ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, विविध भागांमध्ये विशेष पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.

भुसावळ शहरातील अनेक परिसरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये या समस्येबाबत चिंता व्यक्त केली जात होती. यासंदर्भात नगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. नगरपालिकेच्या विशेष पथकांकडून शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्याची कारवाई केली जात आहे. ज्या भागांमधून तक्रारी प्राप्त होत आहेत किंवा ज्या ठिकाणी कुत्र्यांचा उपद्रव अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे, त्या परिसरांना प्राधान्य देऊन मोहीम राबविली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यावेळी नगरपालिकेने पाळीव कुत्र्यांच्या मालकांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत त्यांनी आपल्या कुत्र्यांना पट्टा बांधून घराच्या आवारात ठेवावे तसेच त्यांना रस्त्यावर मोकाट सोडू नये. रस्त्यावर आढळणाऱ्या कुत्र्यांची ओळख पटविणे कठीण असल्याने पाळीव कुत्र्यांवरही नियमानुसार कारवाई होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून पुढील काळातही ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही सहकार्य करत भटक्या प्राण्यांबाबतच्या तक्रारी वेळेवर प्रशासनाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound