Home उद्योग वादळग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या – आमदार अमोल जावळे 

वादळग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या – आमदार अमोल जावळे 

0
15


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात १ जून २०२६ रोजी झालेल्या जोरदार वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई तसेच सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळाचा मोठा फटका बसला असून, शेकडो एकरांवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, अनेकांचे वर्षभराचे उत्पन्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. केळी हे या परिसरातील प्रमुख नगदी पीक असल्याने या नुकसानीचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची अचूक नोंद घेऊन त्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी महसूल व कृषी विभागाने युद्धपातळीवर सर्वेक्षण करावे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आमदार जावळे यांनी मुख्यमंत्री तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र निवेदने सादर केली असून, रावेर-यावल परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने विशेष बाब म्हणून १०० टक्के नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी त्यांची भूमिका आहे.

शेतकरी आधीच वाढत्या उत्पादन खर्च, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेचा सामना करत असताना या वादळामुळे त्यांच्यावर आणखी मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने संवेदनशीलता दाखवत त्वरित मदतीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आमदार अमोल जावळे यांनीही संकटाच्या या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेत शासनाने नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत आणि दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound