Home Uncategorized एलिमेंटरी-इंटरमिजिएट गुणवंतांचा सत्कार

एलिमेंटरी-इंटरमिजिएट गुणवंतांचा सत्कार

0
60


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असून केवळ पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीतच करिअरच्या संधी मर्यादित नाहीत, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले. पिंप्राळा परिसरातील कलादर्शन ड्रॉईंग क्लासेसतर्फे आयोजित एलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा २०२५ च्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर एलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक आणि कला क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना राजेंद्र महाजन यांनी सांगितले की, अनेक पालक मुलांना त्यांच्या आवडीपेक्षा डॉक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट किंवा वकील बनविण्यावर भर देतात. मात्र प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे गुण असतात. चित्रकला, डिझाईन, अॅनिमेशन आणि इतर कलाक्षेत्रांमध्येही आज मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलांच्या आवडीचा आदर करून त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे.

सेवानिवृत्त ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र जावळे यांनी रेखाकला परीक्षेतील यशाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रेरणा दिली. कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा संदेश दिला.

कार्यक्रमात नरेश बागडे, अशोक इसे, पत्रकार प्रवीण पाटील, गिरीष डेरे, छाया इसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासचे संचालक विजय चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन तेजस्विनी चव्हाण, जान्हवी जोशी आणि भक्ती जाधव यांनी केले.

 

 


Protected Content

Play sound