Home Cities जळगाव मेहरूणमध्ये दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव; 80 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

मेहरूणमध्ये दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव; 80 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने खादिम ए मेहरून, सलीम इनामदार अँड फ्रेंड्स सर्कल यांच्या वतीने मेहरूण येथे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

मेहरूण येथील एकता हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमास धर्मगुरू मुफ्ती हारून नदवी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला अलहाज करीम सालार (अध्यक्ष, इकरा), डॉ. माजिद खान (ममता हॉस्पिटल), बुशरा शेख, अंजुम मिर्झा, शकीलभाई कच्छी, इदरीस सेठ मेमन, रज्जाक खान (अध्यक्ष, गाडी मालक-चालक संघटना), मौलाना अकील साहेब (खतीब व इमाम, मस्जिद उमर), जमील इस्माईल शेख, आसिफ शेख बावा, सईद पटेल, अकील सर ब्यावली, आफाक पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धात्मक युगातील संधी तसेच करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या जवळपास 80 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मेडल, पारितोषिक आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालकांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

महिलांसाठी आयोजित विशेष सत्रात बुशरा फाउंडेशनच्या अध्यक्षा बुशरा शेख तसेच अंजुम मिर्झा यांनी विद्यार्थिनी व महिलांना मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी बनावे आणि समाजात नेतृत्वाची भूमिका पार पाडावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनींचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सलीम इनामदार, आकिफ पटेल आणि सरफराज इनामदार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सरफराज इनामदार, दानिश इनामदार, अफसर शेख, आखिफ पटेल, अर्सलान खान, शाकिब मुल्तानी, रिजवान पांडे, आसिफ बागवान, अनीस मंडपवाले, आबिद शाह यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

मेहरून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम समाजात शैक्षणिक प्रेरणा निर्माण करणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

एकता हॉलमध्ये संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव तर झाला, शिवाय शिक्षणाबाबत सकारात्मक संदेशही समाजात पोहोचला. आगामी काळातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला


Protected Content

Play sound