
सांगली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून जामनेर (जि. जळगाव) येथील प्रल्हाद बोराडे यांना ‘महा. अंनिस समर्पित ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच मोहोळ (जि. सोलापूर) येथील धर्मराज चवरे यांना ‘कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार’, आकुर्डी (पुणे) येथील ॲड. मनिषा महाजन यांना ‘कृतिशील महिला कार्यकर्ती पुरस्कार’ आणि इस्लामपूर (जि. सांगली) येथील अजय भालकर यांना ‘मधुरजग युवा प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली. संघटनेची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक ५ ते ७ जून दरम्यान अहिल्यानगर येथे होत असून पुरस्कार वितरण सोहळा ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बडी साजन मंगल कार्यालयात पार पडणार आहे. ज्येष्ठ संपादक व माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
प्रल्हाद बोराडे हे २००७ पासून अंनिसच्या कार्यात सक्रिय असून जळगाव जिल्ह्यात संघटन विस्तार, शालेय शिबिरे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. धर्मराज चवरे यांनी सत्यशोधकी विवाह चळवळ आणि विज्ञाननिष्ठ शिक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. ॲड. मनिषा महाजन या जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करत असून अनेक अंधश्रद्धांचा पर्दाफाश केला आहे. अजय भालकर यांनी सांस्कृतिक माध्यमातून विवेकवादी विचारांचा प्रचार केला आहे.
मानपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी पाच हजार रुपये रोख असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावेळी जातमुक्तीचे कार्य करणाऱ्या सौंदाळा ग्रामपंचायतीचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.



