Home Uncategorized यावलमध्ये मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; संबंधित बीएलओंवर कारवाईची भाजपाची मागणी

यावलमध्ये मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; संबंधित बीएलओंवर कारवाईची भाजपाची मागणी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू असताना अनेक मतदारांची नावे कोणतीही पूर्वसूचना अथवा प्रत्यक्ष पडताळणी न करता मतदार यादीतून कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित बीएलओंवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका उपाध्यक्ष भुषण फेगडे यांनी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन सादर करून ही मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावल तालुक्यातील काही मतदार केंद्रांवर एसआयआर प्रक्रिया सुरू असताना काही बीएलओंकडून अनेक मतदारांची नावे कोणतीही पूर्वसूचना न देता व योग्य पडताळणी न करता मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत.

या प्रकारामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली असून लोकशाही प्रक्रियेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक नागरिक प्रत्यक्षात संबंधित पत्त्यावर वास्तव्यास असतानाही त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भाजपाच्या वतीने प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित बीएलओंनी नियमबाह्य पद्धतीने कार्यवाही केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन सादर करताना भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भुषण फेगडे यांच्यासह वीर येवले, नितीन बारी, हेमंत चौधरी, कोमल इंगळे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound