Home क्राईम पुण्यात विषारी दारूचे मृत्यूतांडव ; १४ जणांचा बळी, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर कारवाईचे...

पुण्यात विषारी दारूचे मृत्यूतांडव ; १४ जणांचा बळी, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश


पुणे-वृत्तसेवा । पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन दिवसांत विषारी दारूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दुर्दैवी प्रकारात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

विषारी दारूमुळे सलग मृत्यूच्या घटना घडत असल्याने प्रशासनाची धावपळ वाढली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत पोलिसांनी रात्रीपासून तपासाची मोहीम सुरू केली आहे. विषारी दारूचा पुरवठा नेमका कुठून झाला, ती कुठे तयार करण्यात आली आणि या संपूर्ण रॅकेटमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना या घटनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना समन्वयाने तपास करून प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “हयगय अजिबात करू नका, एकही आरोपी सुटता कामा नये,” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्याबरोबरच या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचे समजते.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग याला अटक केली आहे. त्याच्यासह आणखी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कलमे लावण्यात आली आहेत. अबकारी विभागही या तपासात सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. तपासात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजत असून आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound