Home क्राईम जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी ; जुन्या वादातून एकाला बेदम मारहाण !

जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी ; जुन्या वादातून एकाला बेदम मारहाण !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत एक कैदी गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ०८ मध्ये २६ मे रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राजू नाना काळे (वय २९, रा. वाल्मीक नगर, जळगाव, सध्या मुक्काम बॅरेक क्र. ०८, उपजिल्हा कारागृह) असे जखमी झालेल्या फिर्यादी कैद्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी श्याम तुकाराम सुर्यवंशी (रा. जैनाबाद, जळगाव) याने जुन्या भांडणाचा राग मनात धरला होता.

याच रागातून श्याम सुर्यवंशी याने राजू काळे याला बॅरेकमध्ये गाठून अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि जोरात भिंतीवर लोटून दिले. या हल्ल्यात राजू काळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर बुधवारी, २७ मे रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound