
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि तस्करी विरोधात जळगाव पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. चोपडा तालुक्यातील मौजे निमगव्हाण येथे दादाजी धुनीवाले मंदिराच्या बाजूला बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली तब्बल १ हजार ७०० ब्रास वाळू जप्त करण्याची धडक प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

जळगाव तालुक्यातील निमगव्हाण गावातील दादाजी धुनीवाले मंदिराच्या परिसरात वाळूचा एक खूप मोठा साठा करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने चक्र फिरवली. त्यांनी तात्काळ चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पथकासह घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन महसूल विभागालाही यात सामील करून घेतले.
महत्त्वाची माहिती: जप्त करण्यात आलेली १ हजार ७०० ब्रास वाळू ही आजवरच्या मोठ्या साठ्यांपैकी एक मानली जात असून, बाजारात याची किंमत लाखोंच्या घरात आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाड टाकत वाळू साठा ताब्यात घेतला असून, सध्या हा साठा जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. ही संपूर्ण कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि नियोजनाखाली पार पडली. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडले असून, जळगाव पोलिसांच्या या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



