
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर रेल्वे स्थानकावर ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर रामशरय पांडे यांनी आज स्थानकाला भेट दिली. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनीही उपस्थित राहून विविध कामांची पाहणी केली तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.

रामशरय पांडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह स्थानक परिसराची पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी डीआरएम पंकज सिंग, डीसीएम आदिश पठानिया, हिमांशू शर्मा यांच्यासह रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानक परिसरातील सुविधा, प्रवाशांसाठी उभारण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच सुशोभीकरणाच्या कामांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खासदार स्मिता वाघ यांनी स्थानकाच्या विकासकामांबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. प्रवाशांना अधिक चांगल्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थानक परिसरात नागरी सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर करण्यावर भर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, नरडाणा–धुळे रेल्वे मार्गाच्या कामाबाबतही खासदार वाघ यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. धुळे आणि जळगाव हे रेल्वेमार्गाने थेट जोडले जावे यासाठी नरडाणा येथे रेल्वे बायपास उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी जनरल मॅनेजर यांच्यासमोर मांडले. यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा करत पत्रव्यवहारही केला. हा रेल्वे बायपास भविष्यात खानदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून मुंबई–पुणे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या या मार्गाने वळविणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खानदेशातील प्रवाशांना रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणीही खासदार वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. तसेच सध्या बंद असलेली पार्सल सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, जेणेकरून व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सैनानी, खा. शी. मंडळ संचालक निरज अग्रवाल, राकेश पाटील, दीपक भोई, शिवाजी राजपूत, राहुल चौधरी यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असून भविष्यात प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नरडाणा बायपास आणि एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांसारख्या मागण्या पूर्ण झाल्यास खानदेशातील रेल्वे प्रवासाला मोठी चालना मिळणार आहे.



