Home Cities यावल यावलच्या आसाराम नगरात सांडपाण्यामुळे नागरिक हैराण; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

यावलच्या आसाराम नगरात सांडपाण्यामुळे नागरिक हैराण; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील आसाराम नगर परिसरात गटारीतील सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आसाराम नगरवासीयांनी नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

आसाराम नगर परिसरातील गट क्रमांक ७०८ मधील प्लॉट क्रमांक ३६ ते ४७ या भागात माजी आमदार कै. हरिभाऊ जावळे यांच्या निधीतून गटारीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. मागील २५ वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम सन २०१९ ते २०२० दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आले. मात्र, गटाराचे बांधकाम नैसर्गिक प्रवाहानुसार करण्यात आले असले तरी पुढील निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे सांडपाणी एका ठिकाणी साचून राहत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

सांडपाण्याची साठवण होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्याच्या गटारीला प्रवाह असलेल्या मुख्य गटाराशी जोडण्यात यावे, जेणेकरून सांडपाण्याचा निचरा सुरळीत होईल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रा नंदन वळींकर, मुकुंदा पाटील, दिनकर फालक, विलास पाटील, विक्रम राजपूत, धनराज फालक, राजेंद्र फालक, नरेंद्र फालक, डॉ. विक्रम पाटील, डॉ. दिपक चौधरी, अमरसिंग राजपूत, विनय राजपूत, यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच परिसरातील महिलांनीही या प्रश्नाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

 


Protected Content

Play sound