Home Cities जळगाव आदिवासी विद्यार्थ्यांना इस्रोची सुवर्णसंधी ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला प्रेरणेचा मंत्र

आदिवासी विद्यार्थ्यांना इस्रोची सुवर्णसंधी ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला प्रेरणेचा मंत्र


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलच्या पुढाकारातून जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील १८ विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली आहे. विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण व्हावे, संशोधनाची प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाच्या नव्या विश्वाशी प्रत्यक्ष परिचय व्हावा या उद्देशाने २७ ते २९ मे २०२६ या कालावधीत ही विशेष शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे.

प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. यावल प्रकल्पांतर्गत रावेर, धरणगाव, चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यातील लालमाती, चांदसर, हातेड, पाल, पिंपळे, बोरगाव, देवळी आणि गुढे येथील विद्यार्थ्यांना या सहलीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही भेट केवळ शैक्षणिक सहल नसून अंतराळ विज्ञानाच्या विश्वाशी प्रत्यक्ष जोडणारा मोठा अनुभव ठरणार आहे.

या शैक्षणिक दौऱ्यापूर्वी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “अहमदाबादमध्ये केवळ फिरण्यासाठी जात नाही आहात, तर तिथे दिसणारी प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. इस्रोमध्ये होणारे संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान, वैज्ञानिकांची कार्यपद्धती आणि प्रत्येक प्रकल्पाचा अभ्यास करा. हा अनुभव तुमच्या भविष्यातील शिक्षणासाठी आणि विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल,” असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना २७ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जळगावातील दादावाडी येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर परतीनंतर ३० मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी त्याच ठिकाणी उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे. सहलीसंदर्भातील अधिक माहितीसाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या सहलीसाठी हातेड, पिंपळे, बोरगाव, पाल, देवळी, गुढे, चांदसर आणि लालमाती येथील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यासोबत चार शिक्षकही सहभागी होणार आहेत. विज्ञान प्रदर्शनात दाखवलेल्या गुणवत्ता आणि जिज्ञासेच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी ही संधी मिळवली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेला भेट देण्याची मिळालेली ही संधी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.


Protected Content

Play sound