
वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून लोकनियुक्त सरपंच शाम सुरेश फुलगांवकर यांनी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. ग्रामहितापेक्षा राजकीय सूडबुद्धी, दबावतंत्र आणि पूर्वनियोजित कारस्थानातून हा प्रस्ताव आणण्यात आल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. या संदर्भात वरणगाव येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संपूर्ण घडामोडींवर सविस्तर भाष्य केले.

पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच शाम फुलगांवकर यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून काही सदस्य आणि उपसरपंचांकडून ग्रामपंचायत प्रशासन अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक मासिक सभांवर सामूहिक बहिष्कार टाकण्यात आल्याने प्रशासनाचे कामकाज वारंवार ठप्प झाले. जवळपास दहा मासिक सभा विस्कळीत झाल्याचा दावा करत त्यांनी या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून सभा हेतुपुरस्सर तहकूब करण्यात आल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असून कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रशासनाचे नियमित कामकाज प्रभावित झाल्याने विकासकामांनाही फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करून स्वतःची आणि ग्रामपंचायतीची बदनामी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामसभांदरम्यान शिवीगाळ, गोंधळ, खुर्च्या फेकणे आणि मारहाणीचे प्रयत्न झाल्याचा आरोप करत फुलगांवकर यांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले. २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या सभेदरम्यान परिस्थिती गंभीर झाली होती आणि त्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जीवितास धोका असल्याचे लेखी निवेदन दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
सरपंचांनी काही सदस्यांविरोधात यापूर्वी शिस्तभंग आणि पदमुक्तीचे ठराव मंजूर झाल्याची माहितीही पत्रकार परिषदेत दिली. संबंधित सदस्यांविरोधातील तक्रारी असूनही प्रभावी कारवाई झाली नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणाऱ्या काही सदस्यांना यापूर्वी थकबाकीदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते, तर नव्याने निवडून आलेल्या एका सदस्याने नियमित सभांना अनुपस्थित राहून थेट अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत संशय अधिक गडद झाल्याचे त्यांनी म्हटले.
“लोकनियुक्त सरपंचांविरोधातील हे षडयंत्र म्हणजे थेट जनतेच्या जनादेशालाच आव्हान आहे,” असा आरोप करत फुलगांवकर यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल दखल घेण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीतील घडामोडींमुळे गावाच्या विकासावर परिणाम होऊ नये आणि प्रशासन सुरळीत सुरू राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



