Home Cities जळगाव वाढती महागाई आणि नीट घोटाळ्यावर जळगावात युवक काँग्रेसची बैठक

वाढती महागाई आणि नीट घोटाळ्यावर जळगावात युवक काँग्रेसची बैठक


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण, वाढती महागाई तसेच शेतकऱ्यांना भेडसावणारी डिझेल आणि खतांची टंचाई या गंभीर प्रश्नांवर युवक काँग्रेसने तीव्र चिंता व्यक्त करत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जळगाव येथे झालेल्या बैठकीत नीट परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत शोक व्यक्त करण्यात आला.

बैठकीदरम्यान नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या नैराश्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणामुळे चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नीट पेपरफुटीप्रकरणी निषेध नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मेहनत करून भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नसल्याचे युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वाढत्या महागाईबद्दलही तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तू आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगण्यात आले. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना डिझेल आणि खतांची टंचाई भासत असल्याने सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर युवक काँग्रेसने टीका केली. शेतीच्या महत्त्वाच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. ही परिस्थिती थांबविण्यासाठी युवक काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून संघर्ष करेल, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

या बैठकीला जळगाव काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष जमील शेख, प्रदेश सचिव किरण पाटील, प्रदेश सचिव आशुतोष पवार, प्रदेश सचिव तुषार संदानशिव, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जळगाव शहर युवक जिल्हाध्यक्ष मुजीब पटेल, युवक काँग्रेस सचिव सलमान तडवी, गौरव देशमुख, भुसावळ विधानसभा युवक अध्यक्ष नगरसेवक रोहन सूर्यवंशी, पाचोरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोहर महाले, चाळीसगाव विधानसभा युवक अध्यक्ष प्रज्वल राजपूत, एरंडोल तालुकाध्यक्ष चेतन पाटील, यावल तालुकाध्यक्ष अनिल कोळी, अमळनेर तालुका ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष विकास पाटील, धरणगावचे योगेश येवले, माजी शहराध्यक्ष गौरव चव्हाण, भडगाव शहराध्यक्ष गोविंद देशमुख, चोपडा शहराध्यक्ष माजित तडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound