
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हृदयविकाराचा गंभीर त्रास असलेल्या २२ वर्षीय गर्भवती महिलेची अतिजोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली असून, विविध वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयामुळे आई आणि बाळ दोघांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना मोठे यश मिळाले आहे. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

वरणगाव येथील निकिता नावाची २२ वर्षीय गर्भवती महिला प्रसूतीसाठी पूर्ण दिवस झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. मात्र तिला पूर्वीपासूनच हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याने तिची प्रसूती अतिशय जोखमीची मानली जात होती. गर्भधारणेमुळे हृदयावर अतिरिक्त ताण येत असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती.
या परिस्थितीत रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तातडीने तपासणी सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हृदयविकार तज्ज्ञ तसेच मेडिसीन विभागातील डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. रुग्णाची विविध तपासण्या करून तिच्या प्रकृतीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.
प्रसूतीदरम्यान महिलेच्या हृदयाची गती, रक्तदाब आणि ऑक्सिजनचे प्रमाण सतत मॉनिटर करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने ही जोखमीची प्रसूती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रक्रियेत डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. संस्कृती भिरूड आणि भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून तिथे स्त्रीरोग व मेडिसीन विभागाचे डॉक्टर सतत निरीक्षण ठेवत आहेत. नवजात बाळालाही आवश्यक उपचार व निरीक्षणासाठी बालरोग विभागात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना डॉ. ऐश्वर्या चलवदे यांनी सांगितले की, हृदयविकार असलेल्या गर्भवती रुग्णांची प्रसूती ही अत्यंत आव्हानात्मक असते. मात्र योग्य नियोजन, सतत निरीक्षण आणि सर्व विभागांच्या समन्वयामुळे ही प्रसूती सुरक्षितपणे पार पडली. वेळेवर घेतलेले निर्णय आणि टीमवर्कमुळे आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवणे शक्य झाले.
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील या यशस्वी प्रसूतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील समन्वय आणि तज्ज्ञतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, परिसरात या घटनेची प्रशंसा होत आहे.



