Home Cities जळगाव हमालीचे काम आणि रोजगार वाचवण्यासाठी माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन !

हमालीचे काम आणि रोजगार वाचवण्यासाठी माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांचा रोजगार धोक्यात आल्याने, ‘जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटना’ आक्रमक झाली आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार धान्य गोदामातील हमालीचे काम पूर्णपणे बंद करून ते वाहतूक ठेकेदारांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी संघटनेच्या वतीने दोन दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

जळगाव शहरातील जी.एस.मैदान परिसरात हमाल व माथाडी कामगारांनी २५ आणि २६ मे असे दोन दिवस हे लाक्षणिक आंदोलन चालणार असून यादरम्यान जिल्ह्यातील धान्य गोदामांचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. रवींद्र सपकाळे आणि जिल्हा सरचिटणीस शरद हिरामण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

माथाडी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या स्थानिक हमाल कामगारांनाच गोदामातील हमालीचे काम पूर्ववत देण्यात यावे, तसेच संबंधित ठेकेदारांनी मजुरी आणि लेव्हीची रक्कम माथाडी मंडळात जमा करावी, अशी प्रमुख मागणी कामगारांनी केली आहे. संघटना प्रशासनाला इशारा दिला आहे की, या दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २७ मे पासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ‘बेमुदत काम बंद आंदोलन’ छेडण्यात येईल.

या आंदोलनाची प्रत माहिती व आवश्यक कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि स्थानिक आमदार राजूमामा भोळे यांनाही सादर करण्यात आली आहे. हा प्रश्न तातडीने सुटला नाही तर जिल्ह्यातील शासकीय धान्य वितरण व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound