Home Cities जळगाव रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात उमेदवारांचा एल्गार ; रिक्त पदांवर तात्काळ नियुक्तीची मागणी

रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात उमेदवारांचा एल्गार ; रिक्त पदांवर तात्काळ नियुक्तीची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेंट्रल रेल्वे (मध्य रेल्वे) मुंबई अंतर्गत वर्ष २००७ मधील ग्रुप-डीच्या भरती प्रक्रियेतील सर्व परीक्षा आणि मेडिकल चाचणी उत्तीर्ण होऊनही गेल्या १९ वर्षांपासून केवळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी अखेर जळगाव येथे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रेल्वे प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे ३०० ते ३५० मेडिकल पात्र उमेदवारांनी आज, २५ मे रोजी पासून जी.एस. मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

माहिती अधिकार कायदयातून मिळालेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेत अजूनही ६९८ पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांवर तात्काळ नियुक्ती देण्यात यावी यासाठी उमेदवारांनी रेल्वे बोर्ड, दिल्ली आणि मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरांना वारंवार विनंत्या केल्या, तसेच १० दिवसांचा अल्टिमेटमही दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उमेदवारांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे.

उमेदवारांनी प्रशासनासमोर प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. भोपाळ, गुवाहाटी, पाटणा, गोरखपूर आणि हुबळी येथील रेल्वे बोर्डांनी ज्याप्रमाणे अनेक वर्षांनंतरही वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना ‘स्पेशल पॅनल’ तयार करून नियुक्त्या दिल्या, त्याच धर्तीवर मुंबई मध्य रेल्वेनेही भेदभाव न करता नियुक्ती पत्रे जारी करावीत. उमेदवारांच्या या मागणीला केंद्रीय मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधींनी पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे.

“लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्यांच्या आरोग्यास कोणतीही हानी पोहोचल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन, रेल्वे बोर्ड आणि महाराष्ट्र शासनाची असेल,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि भुसावळ रेल्वे व्यवस्थापकांना (D.R.M) सादर करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound